महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल

महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल

मागच्या 3 वर्षांत 5 राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यपालांवर भाजपबद्दल पक्षपाती करण्याचे आरोप झाले. कोणकोणत्या राज्यांत भाजपने बहुमत नसताना सरकार बनवलं ते पाहूया.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने सरकारस्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर 22 आणि 23 नोव्हेंबरला वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले जातायत.मागच्या 3 वर्षांत 5 राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यपालांवर भाजपबद्दल पक्षपाती करण्याचे आरोप झाले. कोणकोणत्या राज्यांत भाजपने बहुमत नसताना सरकार बनवलं ते पाहूया.

महाराष्ट्र : 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाआघाडीची चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वसहमतीने मुख्यमंत्रिपदासाठी ठरलं होतं. पण 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली. रात्री साडेबारा वाजता मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राज्यपालांनी त्यांचा दौरा रद्द केला, राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मग शपथविधी झाला.

कर्नाटक : 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं पण भाजपचं सरकार विधानसभेत बहुमत चाचणी यशस्वी करू शकलं नाही. त्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचं सरकार आलं. पण 17 आमदारांनी समर्थन द्यायला नकार दिला. या सगळ्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं. या प्रकरणात राज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोप झाले.

(हेही वाचा : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला 'हा' नेता होऊ शकतो विधानसभेचा हंगामी अध्यक्ष)

मेघालय : 2018 मध्ये मेघालयच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे 21 जागा होत्या पण राज्यपालांनी सरकार बनवण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमा बोलवलं. भाजपकडे फक्त 2 जागा होत्या आणि त्यांच्याशी युती करणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या.

गोवा : 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर 40 सदस्यांच्या विधानसभेत 18 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष होता. पण राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजप सरकारला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं. काँग्रेसने याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि पर्रिकरांचा शपथविधी थांबवण्याची मागणी केली. पण कोर्टाने शपथविधी न रोखता मनोहर पर्रिकर यांना विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. यामुळेही राज्यपालांच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली.

(हेही वाचा : अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं, शरद पवारांनी फटकारलं!)

मणिपूर : 2017 मध्ये 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसचे 28 आमदार जिंकले. भाजपकडे 21 आमदार होते पण राज्यपालांनी निवडणुकीनंतर झालेल्या युतीच्या आधारे भाजपला सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भाजपचं सरकार आलं.

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या