मुंबई, 03 जून : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक ट्वीट केलं आहे. दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज पाचवा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी हे ट्वीट केलं आहे. ‘मायेची सावली हरवली.. सर्व मिळवता येतं पण ही सावली नसल्याने ऊन पोळतं.. जग जिंकता येतं पण पाठीवर थाप मारायला कोणी नसतं... सदैव असंच वाटतं.. काहीही मिळवलं तरी उणे मुंडे साहेब हाती काही उरतच नाही...आनंद छोटे आणि दुःखं ठेंगणी आहेत बाबा तुमच्या शिवाय' असं पंकजा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 2014मध्ये भाजपनं मिळवलेल्या विजयानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला यंदा पाच वर्षे झाली आहे.
मायेची सावली हरवली ... सर्व मिळवता येतं पण ही सावली नसल्याने ऊन पोळतं .. जग जिंकता येतं पण पाठीवर थाप मारायला कोणी नसतं ... सदैव असंच वाटतं.. काहीही मिळवलं तरी उणे मुंडे साहेब हाती काही उरतच नाही ...आनंद छोटे आणि दुःखं ठेंगणी आहेत बाबा तुमच्या शिवाय .. pic.twitter.com/pZJn2qB1wJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 3, 2019
गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त परळीतील गोपीनाथ गड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजर आहेत. यानिमित्त मराठवाडा, नगर आणि सोलापूर येथील खासदारांचा सत्कार देखील केला जाणार आहे.
युतीचे शिलेदार
गोपीनाथ मुंडे यांना शिवसेना – भाजप युतीचे शिलेदार म्हणून देखील ओळखलं जातं. शिवसेना – भाजपची राज्यात युती करण्यामागे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज देखील शिवसेना – भाजपमध्ये आलेल्या कटुतेवेळी राजकीय वर्तुळात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली जाते. 1999मध्ये युतीचं सरकार राज्यात सत्तेत आलं. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गृहमंत्री म्हणून देखील त्यांची कारकिर्द गाजली होती.
VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण