CM फडणवीसांचं अजित पवारांना थेट आव्हान, गोपीचंद पडळकरांना बारामतीतून उतरवणार

CM फडणवीसांचं अजित पवारांना थेट आव्हान, गोपीचंद पडळकरांना बारामतीतून उतरवणार

बारामतीत अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना रंगणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी आपली इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

'गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. त्यामुळे त्यांनी जंगलाचा राजा असल्यासारखं राहिलं पाहिजे. त्यांना थेट बारामतीतून निवडणुकीत उतरवण्याचा आमचा विचार आहे. याबाबत आम्ही पक्षाकडेही बोलू,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून तिकीट देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना रंगणार आहे.

बारामतीत भाजपचा लोकसभा पॅटर्न

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीचं संकट परतावून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. पण त्यानंतर बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकला आहे.

भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच भाजप त्यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading