उस्मानाबाद, 05 जुलै: राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले आहे. आता तर 'तुझी इज्जत लुटतो' अशा अर्वाच्च भाषेत गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshna Salgar) यांना धमकी दिली आहे. या प्रकरणी सलगर यांनी उस्मानाबाद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले, असंही सलगर यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने सोलापूरमध्ये पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. या प्रकरणावर सक्षणा सलगर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर पडळकर यांच्या कार्यकर्त्याने सलगर यांना अर्वाच्च भाषेत बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाहीतर 'तू एकदा भेट तुझी इज्जत लुटतो' अशी धमकीही दिली.
या धमकीनंतर सलगर यांनी ट्वीट करत धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबरच जाहीर केला. 'मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता' असं सलगर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर सलगर यांनी उस्मानादेतील ढोकी पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी फोन करणाऱ्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करू अशी मागणी सलगर यांनी केली.
तर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सलगर यांची पाठराखण केली आहे. "अशा शब्दांत कुणी फोन करून धमकी देत आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशा पद्धतीने कोणत्याही महिला आणि तरुणीला कुणी धमकावू शकत नाही आणि जे कुणी असं करेल त्याला आम्ही सोडणार नाही. राजकीय नाहीतर हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांनी सलगर यांना पाठिंबा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.