प्रविण तांडेकर, गोंदिया, 15 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यात 25 वर्षीय पदमा उईके या महिलेने आपल्या 18 महिन्याची मुलगी मुस्कान उईके हिच्यासोबत विहरीत उडी घेत केली आत्महत्या केली आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिरामनटोला गावात ही घटना घडली आहे.
गोंदिया तालुक्याच्या चिरामनटोला गावात राहणाऱ्या पदमा उईके या महिलेचं काल रात्री पती पंकज उईके सोबत भांडण झाले होतं. तर पदमाची समजूत घालण्यासाठी तिचे वडील तिच्या घरी आले होते. त्यांनी देखील पदमाची समजूत घातली होती. सकाळी घरातील सर्व सदस्य उठल्यावर पदमा आणि मुलगी मुस्कान या दोघी दिसल्या नाहीत.
मायलेकी घरातून गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचा शोधाशोध सुरू झाला. सर्वत्र शोध घेण्यात आला असता घरासमोरील विहिरीत पदमा आणि मुस्कान हिचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी हा सगळा पोलिसांना कळवला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले असून यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पदमाने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा शोध रावणवाडी पोलीस घेत आहेत.
दरम्यान, याआधीही महिलांनी कौटुंबिक तणावातून आपल्या मुला-मुलींसह आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी कुटुंबातील सुसंवाद ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे.