कोल्हापूर, 06 मार्च : गोकुळ दूध संघावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मंगळवारी रात्री 4 तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी करण्यात आली. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय रित्या चौकशीही झाली. आयकर विभागाच्या धाडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकराची रक्कमेबाबत मंगळवारी रात्री चार तासांहून जास्त वेळ संघाची चौकशी करण्यात आली. एका महिला अधिकाऱ्यासह पाच जणांच्या पथक गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात आले होते.
गेल्या तीन महिन्यातील आयकर भरणा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. दरमहिन्याला गोकुळ आयकराची रक्कम भरते. गेल्या तीन महिन्यात ही रक्कम कमी जास्त भरल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने गोकुळच्या कार्यालयात चौकशी केली. संघाच्या गेल्या तीन महिन्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. संघाने विक्री केलेला माल, उत्पादन, विक्रीतून मिळालेला नफा या सर्व कागदपत्रांची तपासणी पथकाने केली. याशिवाय दूध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची माहिती देण्याची सूचना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत असताना संघाच्या कार्यकारी संचालकांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. तसेच आर्थिक व्यवहारांचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चौकशी होईपर्यंत थांबवून ठेवण्यात आले होते.
चार तास चौकशी केल्यानंतर गोकुळने तब्बल पाच कोटी आयकर कमी भरला असल्याचे समजते. ही रक्कम भरण्याची नोटीस संघाला आयकर विभागाने दिली असल्याचेही वृत्त आहे. आयकर विभागाचे अधिकारी आल्यानंतर संघाच्या कार्यालयात अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा पडल्याची अफवाही पसरल्याने मोठी खळबळ उडाली होती. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकर विभागाची नियमित तपासणी असल्याचं सांगितलं.
SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!