विरार, 24 मार्च प्रतिनिधी : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या वीस वर्षीय तरुणीवर मित्राला बांधून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यश शिंदे आणि धीरज सोनी असं या आरोपींची नावं आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पीडित तरुणी ही आपल्या मित्रासोबत विरार पूर्वमध्ये असलेल्या साईनाथ नगर येथील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेत तेथे दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी तरुणीचे फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेच्या मित्राला मारहाण
यावेळी आरोपींनी या तरुणीच्या मित्राला मारहाण करत पट्ट्याच्या मदतीनं बांधून ठेवलं. त्याचे कपडे देखील काढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी या तरुणीवर अत्याचार केला. तिचा मित्र नग्न अवस्थेत डोंगराखाली आला असता काही नागरिकांनी त्याला पाहिले व त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पीडित तरुणी व तिच्या मित्राने विरार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह, लूट, मारहाण अशा विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करून आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुणावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Palghar