अन्यायाचे भांडवल नको, नावे जाहीर करा, महाजनांच्या या आव्हानाला खडसेंचे प्रत्युत्तर

अन्यायाचे भांडवल नको, नावे जाहीर करा, महाजनांच्या या आव्हानाला खडसेंचे प्रत्युत्तर

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

  • Share this:

जळगाव,7 डिसेंबर: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज्यात सरकार स्थापन केल्याने भाजपची गोची झाली आहे. विधानसभेत विरोधी बाकावर बसलेल्या भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद हळूहळू चव्हाट्यावर येत आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपविरूद्ध भाजप असे चित्र दिसत आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी जळगावात भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर आले. मात्र, एकनाथ खडसे या बैठकीला पोहोचणार नाही अशी चर्चा होती. अखेर, ऐनवेळी खडसे यांनी बैठकीला हजरी लावली.

अन्यायाचे भांडवल नको.. नावे जाहीर करा

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पक्षातीलच काही नेत्यांमुळे परळीत पंकजा मुंडे यांचा आणि मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. मात्र, खडसेंच्या आरोपात काही तथ्य नाही, रोहिणींच्या पराभवाबाबत खडसेंकडे कोणतेही पुरावे असल्यास त्यांनी ते नावानिशी सादर करावे, असे आव्हान गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर खडसे यांनी महाजनांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी परवानगी दिल्यास जनतेसमोर नावानिशी पुरावे सादर करीन, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकप्रसंगी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना वाटत असेल, त्यांच्याकडे पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी माहिती असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. स्वत: एकनाथ खडसे या मतदारसंघात यापूर्वी किती मतांनी निवडून आले हे अभ्यासले पाहिजे. या निवडणुकीत एक वेळ ते स्वत: उमेदवार असते तर निवडून आले असते, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही...

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुरावे वगैरे आता प्रश्‍नच नाही. मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही. गिरीशभाऊंनी सांगितले होते की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर, जनतेसमोर मांडा. माझ्याकडे नावानिशी सर्व पुरावे आहेत. परंतु, ही माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. आमच्या पक्षाची शिस्त आहे, असंही खडसे म्हणाले. पक्षाचे उमेदवार पराभूत होण्यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कोणी काम केलं याची विश्‍लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत.

चंद्रकांत पाटलांची मध्यस्थी

उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीसाठी चंद्रकांत पाटील जळगावात पोहोचले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आमनेसामने आले आहे. पक्षातीलच काही नेत्यांमुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला. तसंच मुलगी रोहिणी खडसेंच्या पराभवालाही त्यांनी भाजपतील काहींना जबाबदार ठरवलंय. मात्र, खडसेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही रोहिणींच्या पराभवाबाबत खडसेंकडे कोणतेही पुरावे असल्यास त्यांनी ते सादर करावे, अशी मागणी गिरीश महाजनांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 7, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading