भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच गणेश नाईकांचा युतीच्या नेत्यांना दणका

भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच गणेश नाईकांचा युतीच्या नेत्यांना दणका

भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच गणेश नाईक यांनी युतीच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 19 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पण एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच गणेश नाईक यांनी युतीच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत नाईक यांना युतीने आव्हान दिलं होतं. पण या निवडणुकीत नाईक गटाने युतीचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. नाईक यांनी युतीच्या नमो पॅनलचा पराभव केला. नाईक यांच्या डॉ. राणे पॅनलचा 11 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय झाला आहे.

गणेश नाईक आणि युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या आधी स्वत: नाईक यांचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईकांच्या भाजपप्रवेशानंतर नाईक गट आणि युतीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होणार, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गणेश नाईक आणि भाजपप्रवेशाची चर्चा

गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.

राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

नवी मुंबईत नाईक कुटुंबासह राष्ट्रवादीचे इतर नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नगरसेवकांना रोखण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आहे. 8 ते 10 नगरसेवक राष्ट्रवादी सोडणार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व 57 नगरसेवक हातावरचं घड्याळ सोडून हातात 'कमळ' घेणार असल्याची चर्चा काल रंगत होती. या नगरसेवकांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडू शकतं. नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गड समजला जातो आणि तिथेच मोठं खिंडार पडल्याने पक्षाला हा मोठा हादरा मानला जात आहे.

भाजपच्या खेळीला राष्ट्रवादी कसं देणार उत्तर?

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

VIDEO: भरधाव एसटीची कंटेनरला धडक, 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 09:40 AM IST

ताज्या बातम्या