माओवादी हल्ल्याचा मतदानाशी संबंध आहे का? सरकार आणि पोलिसांमध्ये दुमत

माओवादी हल्ल्याचा मतदानाशी संबंध आहे का? सरकार आणि पोलिसांमध्ये दुमत

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याशी मतदानाचा संबंध नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. माओवाद्यांविरुद्ध मागच्या वर्षी केलेल्या कारवाईचा बदला म्हणून त्यांनी हा हल्ला केला असावा, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी पुष्टी दिली आहे.

  • Share this:

गडचिरोली, 1 मे : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून भीषण हल्ला केला आहे. गडचिरोलीमधल्या जांभूरखेडामध्ये भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले तर गाडीच्या चालकाचा मृत्यू ओढवला.

या हल्ल्याची भीषणता इतकी होती की गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. महाराष्ट्र दिनीच हा स्फोट घडवून आणण्यात आला. देशात लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरू असताना हा हल्ला झाला आहे ही गोष्ट राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली.

'लोकशाही उद्धवस्त करण्याचा उद्देश'

नागरिक मतदानासाठी दोनदोन तास रांगेत उभं राहून मतदान करत आहेत.पण हीच लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा माओवाद्यांचा उद्देश आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

असं असलं तरी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मात्र या हल्ल्याशी मतदानाचा संबंध नाही, असं वक्तव्य केलं आहे. देशाला धोका पोहोचवण्याचा माओवाद्यांचा नेहमीच उद्देश राहिला आहे आणि याच दहशत पसरवण्याच्या हेतून हा हल्ला झाला, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

'गुप्तचर यंत्रणांचं अपयश नाही'

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनाला लक्ष्य करून केलेला हा हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश नाही, असंही सुबोध जयस्वाल यांचं म्हणणं आहे.

मागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले.

कारवाईचा बदला

या कारवाईत माओवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सिनू यांनाही मारण्यात आलं. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांतली ही सगळ्यात मोठी कारवाई होती. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.

==============================================================================

VIDEO : गडचिरोलीत नेमकं काय घडलं? पोलीस महासंचालकांची UNCUT पत्रकार परिषद

First published: May 1, 2019, 6:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading