Home /News /maharashtra /

देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना, कल्याणमधून भामट्याला बेड्या

देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना, कल्याणमधून भामट्याला बेड्या

ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भामट्याने खोटे कागदपत्रे दाखवत शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

ठाणे, 3 मार्च : सर्वसामान्य माणसं प्रामाणिकपणे आपला टॅक्स भरतात. सर्वसामान्याला प्रत्येक वस्तूमधून GST भरावा लागतो. पण ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भामट्याने खोटे कागदपत्रे दाखवत शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशातील GST फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जात आहे. संबंधित घटना ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून समोर आली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीला कल्याण इथून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संबंधित 49 वर्षीय आरोपीचं अशोक राजभर असं नाव आहे. त्याने हार्डवेअरींग आणि नेटवर्किंगचा व्यापार असल्याचं दाखवलं होतं. त्याने शासनासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला होता. त्यातून त्याने शासनाची 84 कोटी रुपयांची फसवणूक केली. (नितीन गडकरी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर भडकले, 'निकम्मे' म्हणत दिला मोठा इशारा) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक मुसाफीर राजभर याने ए.सी.एस. हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग नावाने फर्म सुरु केले होते. त्याने डिसेंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत कर चुकवेगिरीस मदत करणे याच उद्देशाने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर नोंदणी क्रमांकासाठी कागदपत्रे दाखल करत GSTIN प्राप्त केले. आरोपी व्यापाऱ्याने व्यापार न करता केवळ जाचक पुरवठा केल्याबाबत खोटी बिले विविध करदात्यांना दिली. तसेच GSTR3B Return Form मध्ये 474,33,63,506 रुपयांच्या रकमेचा खोटा व्यापार दर्शवला. त्यामुळे त्याला महाराष्ट्र सरकारचा 85,38,05,436 रुपयांचा महसूल Input tax Credit मिळाला. अशाप्रकारे त्याने सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्याच्या या फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय सहाय्यक राज्यकर आयुक्त अनिल यमगर यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना आरोपीच्या कुकृत्याची खबर लागल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे पोलिसांना आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे देखील मिळाले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित गुन्ह्याखाली अटक दखील केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या