वैभव सोनवणे, (प्रतिनिधी)
पुणे, 13 जुलै- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेतील पैशावर माजी विद्यार्थ्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमवा व शिका योजनेत 3 लाख 46 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. चौदाशे ते सोळाशे बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने हे पैसे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्यापीठाच्या तीन माजी विद्यार्थ्यांच्या विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोर भानुदास मगर ( रा. मारवाड, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) आणि किरण गायकवाड (रा.मुढाळे, ता. बारामती) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर 2012 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत हा अपहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान यामध्ये विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग म्हणून सर्वच योजनांचा नियमित आढावा घेतला जातो. त्यानुसार 'कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजने'चा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वितरित करताना काही आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति तास 45 रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. दररोज तीन तास काम करण्याची मुभा आहे. अनेक गरजु विद्यार्थ्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी याची मदत होते. महिनाभरात संबंधित विद्यार्थ्याने किती तास काम केले, त्याआधारे एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण या प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला