सत्तेसाठी रस्सीखेच, बंडखोर आणि अपक्षांसाठी सेना-भाजमध्येच चढाओढ!

सत्तेसाठी रस्सीखेच, बंडखोर आणि अपक्षांसाठी सेना-भाजमध्येच चढाओढ!

निवडणुकीआधी बंडखोरांना युतीत स्थान मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र, निकालानंतरचं चित्र वेगळंच दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेची चर्चा रंगली आहे. युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. दरम्यान, 15 बंडखोर आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.

भाजप आणि शिवसेना यांच्यातच आता बंडखोर आणि अपक्षांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आतापर्यंत सेनेला चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर आतापर्यंत तीन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मीरा भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांच्या पाठोपाठ अपक्ष आमदार रवी राणा आणि राजेंद्र राऊत यांनीही भाजपला पाठिंबा दिला.

सत्ता स्थापनेच्या खेळात आता बंडखोर आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला असून दोन्ही पक्ष त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी कामाला लागले आहेत. निवडणुकीआधी बंडखोरांना युतीत स्थान दिले जाणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. मात्र, आता निकाल लागताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत 15 बंडखोर संपर्कात आहेत असं सांगितलं होतं.

वाचा : सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा; राज्यातील निम्म्या जिल्ह्यात मिळालाय भोपळा!

शिवसेनेला चार आमदारांचा पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाठिंबा देत आहोत असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रामटेकचे आशिष जयस्वाल, भंडाराचे नरेंद्र गोंडेकर यांनी सेनेला पाठिंबा दिला. यामुळे सेनेचे संख्याबळ 60 वर पोहचले आहेत. आणखी दोन आमदार शिवबंधनात अडकण्याची शक्यता असून ही संख्या 62 वर पोहचू शकते.

वाचा : राष्ट्रवादीला धक्का, निकालानंतर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

राज्यात सत्ता कुणाची?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्तेचा कॅनव्हास रंगवण्यासाठी ब्रश उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे म्हणत युती सरकारवर कंट्रोल आमचाच असणार असा इशारा दिला होता. तर दुसरीकडे भाजपने त्यांचे संख्याबळ 120 पर्यंत पोहचेल असा दावा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत काँग्रेसला फायदा होईल असा निर्णय़ उद्धव ठाकरे घेणार नाहीत असं सूचक वक्तव्य करत युतीचेच सरकार येईल असं स्पष्ट केलं होतं.

सध्याचे संख्याबळ

सध्या भाजपचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 तर काँग्रेसचे संख्याबळ 44 आहे. बंडखोर, अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांची संख्या 28 इतकी आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. सेनेला भाजपसोबतच जावं लागणार आहे. याआधी आघाडीकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला जाईल अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही असं स्पष्ट करत विरोधी पक्षातच राहणार असं म्हटलं होतं.

शिवसेना भाजप नेते राज्यपालांना भेटणार

दरम्यान, भाजप आणि शिवसेना नेते आज राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते राज्यपालांना भेटणार आहेत. दोघेही वेगवेगळी भेट घेणार असल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याची माहिती आहे. असं असलं तरी विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

वाचा : कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

First published: October 28, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading