नाशिक, 12 जून- नाशिकहून चारधामला निघालेल्या यात्रा कंपनीच्या बसला मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 7 गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात मंगळवारी (11 जून) रात्री साडे नऊच्या सुमारास विदिशा-सागर महामार्गावर हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, सर्वज्ञ यात्रा कंपनीची ही बस आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस उज्जैनहून चित्रकूटला निघाली होती. बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
SPECIAL REPORT : इम्रान खान यांच्यावर का आली मोदींसारखं पाऊल उचलण्याची वेळ?