मुंबई, 26 मे : महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची एक बैठक बोलावली होती. मविआनंतर आता सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटानं देखील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदारांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना
या बैठकीमध्ये 2019 मध्ये शिवसेनेनं ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या 22 मतदारसंघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत, तर ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
फॅार्म्युला ठरला?
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 2019 च्या जागा वाटपाप्रमाणेच म्हणजेच शिवसेना 22 आणि भाजप 26 हा फॉर्म्युला कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार आता शिंदे गट आ्रणि भाजपने रणनिती ठरवण्यास सुरूवात केल्याचं देखील वृत्त आहे.
ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा
दुसरीकडे मात्र मविआत जागा वाटपावरून बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे वारंवार आमचे दादरा नगर हवेली धरून एकूण 19 खासदार लोकसभेत जातील असा दावा करत आहेत. त्यामुळे मविआत जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis