कोल्हापूर, 10 ऑगस्ट : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष आहे. मात्र हेच राजू शेट्टी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून सरकारविरोधात उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आता राजू शेट्टी हे वीज बिलांबाबतच्या तक्रारींबाबत सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
'कोल्हापूरमध्ये आज वीज बिलांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला रोजगार नाही. या काळात ग्राहकांनी जास्त वीज वापरली का नाही? याची खातरजमा न करता, त्यांना वाढीव वीज बिल पाठवले आहे. ही वीज बिल सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू,' असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
माजी उर्जामंत्र्यांनीही दिला आक्रमक इशारा
ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला इशारा दिला होता. 'काही टक्के सूट देऊन हा प्रश्न निकाली निघणार नाही. चार महिन्याच्या लॉकडाऊन काळामध्ये तीनशे युनिट पर्यंत प्रतिमहिना, चार महिन्याचे बाराशे युनिट इतकं वीज बिल मध्यम परिवाराच माफ करावं, जर मध्यमवर्गीयांना 300 युनिट 4 महिन्याचे 1200 युनिट इतक वीजबिल माफ केले नाही, तर वीज कनेक्शन कापण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांना वीज कनेक्शन कापू देणार नाही,' अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.