सोलापूर, 09 फेब्रुवारी : मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या लोकमंगल कारखान्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता त्याच्या नावावर परस्पर कर्ज काढल्याचा आरोप लोकमंगल कारखान्यावर करण्यात आला आहे.
माजी सहकारमंत्री आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल उद्योग समुहापैकी असलेल्या लोकमंगल शुगर इथॅनोल अँन्ड को जनरेशन हा उद्योग आहे.
या कारखान्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतून शेतकऱ्याच्या नावाने 2 लाख 98 हजारांचे कर्ज काढल्याची तक्रार शेतकऱ्याने पोलिसात दिली. गुलाब नबीलाल शेख असं या तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
सोलापुरातील भंडारकवठे आणि बीबी दारफळ अशा दोन ठिकाणी लोकमंगल साखर कारखाना कार्यरत आहे. यापूर्वी देखील या कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमार्फत लोकमंगल कारखान्याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
2016 साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सोलापुरातील एका शाखेतून 2 लाख 98 हजारांचे कर्ज तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
मात्र, अशा पद्धतीने कोणत्याही कर्जाची मागणी आपण केली नसल्याचं गुलाब शेख यांचं म्हणणं आहे. या कर्जाचे आता मुद्दल आणि थकीत व्याज मिळून 4 लाख 80 हजार 800 रुपयांची थकबाकी झाली आहे. ज्यावेळी कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलो तेव्हा प्रकार समजला अशी माहिती गुलाब शेख यांनी दिली. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदाराने केली.