सिंधुदुर्ग, 11 जानेवारी: तारणारा असेल तर मृत्युलाही चकवा देता येतो, असे म्हटलं जातं. हाच अनुभव सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी आलेल्या रशियन पिता-पुत्राला आला आहे. ते दोघे सिंधुदुर्गातल्या रेडी समुद्रात बुडत असताना स्थानिक जीवरक्षकांनी त्यांचे प्राण थोडक्यात वाचवले आहेत.
काय आहे घटना?
शुक्रवारी दुपारी गोव्यातून ॲलेक्स आणि मुलगा सॅन हे दोघे फिरत फिरत सिंधुदुर्गातल्या रेडी समुद्रकिनाऱ्यावर आले. रेडीजवळ असलेल्या ऐतिहासिक यशवंत गडाला भेट देऊन झाल्यानंतर त्यांना तिथल्या निळ्याशार समुद्राच्या पाण्यात उतरायचा मोह आवरता नाही. ॲलेक्सला पोहोता येत असलं तरी अवघ्या 13 वर्षाच्या सॅन मात्र पोहोण्याचा अनुभव नव्हता. समुद्राच्या लाटांच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे सॅन समुद्रात खेचला जाऊ लागला. सॅन गटांगळ्या खात असल्याचे पाहून ॲलेक्सही त्याला सावरायला गेला. खरा पण त्याचाही धीर खचल्यामुळे हे दोघे पिता पुत्र बुडू लागले. य्याचवेळी या किनाऱ्यावर टेहळणी करणारे जीवरक्षक संजय गोसावी आणि दिलीप रुद्रे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. जराही उशीर न करता संजय आणि दिलीप यानी रिंग बोया घेऊन स्वत:ला समुद्रात झोकून दिले. जलदगतीने पोहत खोल समुद्रात बुडणाऱ्या या दोघांजवळ हे जीवरक्षक पोहोचले आणि त्यांना बुडता बुडता या दोघांनी जीवदान देत किनाऱ्यावर आणले. ॲलेक्स आणि सॅन ने तर आपल्याला पुनर्जन्मच मिळाल्याचे सांगत दोघांचे आभार मानले.
गोव्यातले विदेशी पर्यटकही पडतात सिंधुदुर्गाच्या मोहात..
सिंधुदुर्गातले समुद्रकिनारे गोव्यापेक्षाही सुंदर असल्यामुळे गोव्यातले विदेशी पर्यटकही सिंधुदुर्गाच्या मोहात पडतात. विशेषत: रशियन पर्यटकांची विशेष पसंती सिंधुदुर्गच्या किनाऱ्याना आहे. त्यामुळे रेडी समुद्रकिनारा असो, वेळागर समुद्रकिनारा किंवा तेरेखोल. गोव्यापासून हे किनारे अगदी जवळ असल्यामुळे परदेशी पर्यटकांची नेहमीच या किनाऱ्यांवर वर्दळ असते. हे ओळखून इथले स्थानिक जीवनरक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता देशी आणि विदेशी पर्यटकांना समुद्रात बुडताना वाचवत असतात. अशा धाडसी जीवनरक्षकांच्या पाठीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांनीही शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे. तरच अशा जीवनरक्षकांना आपल्या कामामध्ये आणखी स्फूर्ती मिळेल, रेडी येथील या दोन्ही जीवनरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Foreign tourist, Konkan, Sea, Sea beach, Sindhudurg news