राजेश भागवत, जळगाव 8 जून : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दूषित पाणी पिल्याने विषबाधा झाली. या प्रकरणी 50 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दूषित पाण्यातूनच ही विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोळन्हावी गावात दुपारी अचानक एक एका ग्रामस्थाची प्रकृती बिघडायला सुरुवात झाली. ही बातमी गावात पसरली. सर्वांना सारखाच त्रास होऊ लागल्याने हा विषबाधेचा प्रकार असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. ग्रामस्थांना उलटयांचा आणि जुलाबचा त्रास होऊन विषबाधा झाल्याने दुपारी दोन वाजेपासून एकेक ग्रामस्थ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत असल्याने खळबळ उडाली.
आतापर्यंत 50 जणांना सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले असून आणखी रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुषित पाण्यामुळेच ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
घातपाताचा संशय
अज्ञात समाजकंटकाने पाण्यात विषारी पदार्थ मिसळला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे. 108 या रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. काही जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांनी दिलीय.
या प्रकरणी पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. आपसातील भांडण, पूर्व वैमनस्य अशा सर्व शक्यतांचा विचार करून तपास करू अशी माहितीही पोलिसांनी दिलीय. त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनीही जागरूक राहावं असं पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.