अनिस शेख, (प्रतिनिधी)
देहु, 13 जुलै- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पुलाला तडे गेले असून काही ठिकाणी तर स्लॅब कोसळण्याच्या घटनाही घडली आहे. पावसात मोठ्या प्रमाणात पुलावर पाण्याचे डबके तयार होत असल्याने भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे पुलावर जमलेले पाणी थेट महामार्गावर खाली प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर पडत आहे. अचानकपणे अंगावर पडत असलेल्या या घाण पाण्यामुळे वाहनचालकही भांबावून जातात. त्यामुळे अपघाताचा धोकाही अधिक वाढला आहे.
देहूरोड ऑर्डनस फॅक्टरी ते गुरुद्वारापर्यंत बनवण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आले होते. अवघ्या पाच महिन्यांत या पुलाच्या निकृष्ट दर्जाचे काम समोर आले आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे उपस्थित होते.
या उड्डाणपुलाचे काम टी अॅण्ड टी कंपनीतर्फे करण्यात आले आहे. पुलाची निविदा 43 कोटी रुपयांची होती. 18 महिन्यांत हे काम पूर्ण झाले आहे. पुलाची लांबी एक किलोमीटर असून रुंदी 17.100 मीटर आहे. तर दुभाजकाची रुंदी 1.100 मीटर आहे. सुरक्षा कठडे एक मीटर उंचीचे आहेत. तर, 24 खांब आहेत. प्रकाशासाठी 90 एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत
विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला