जळगाव, 28 जानेवारी : जळगाव (Jalgaon) शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या (Rustamji International School) परिसरात जंगलात आगीचा भडका उडाला होता. जवळपास 8 किलोमीटरच्या परिसरात आग पसरली होती.
शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात बुधवारी रात्री पावणे दहा वाजता अचानक आग लागली. बघता बघता सात ते आठ किलोमीटरपर्यंतच्या जंगलात ही आग वेगाने पसरली. आगीचा प्रकार लक्षात येताच चौधरी नामक व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
या दरम्यान मोहाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. आलेल्या ग्रामस्थांसह तरूणांकडून झाडाच्या फांद्या तोडून ग्रामस्थांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आल्याचे समजते. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही.
भिवंडीत कंपनीला भीषण आग
दरम्यान, भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाला आहे. ही कंपनी ग्राउंड प्लस दोन मजल्याची आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची, मोठी वित्तीय हानी झाली आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.