भंडारा, 27 ऑक्टोबर : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी (lakhani)शहरातील अंबिका फटाका सेंटरला (ambika Phatka Center) मध्यरात्री भीषण आग (fire ) लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन दुकानं जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातील सिंधी लाइन परिसरात मेहर यांच्या अंबिका फटाका सेंटर ला मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. फटाका सेंटर असल्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप घेतले. आग इतकी भीषण होती की, फटका सेंटरच्या बाजूला असलेल्या नागराज फूलवाला यांचे दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे सुदैवाने दुकानात आणि परिसरात कुणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाका दुकानाला आग लागल्यामुळे दुकानातील फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे लागले होते.
आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली होती. त्यानंतर लाखनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यात जवानांना यश आले.
या दुर्घटनेमध्ये दोन्ही दुकांनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तर आगीचे कारण, अस्पष्ट असले तरी मात्र शार्ट सर्किटने आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.