उस्मानाबाद, 21 डिसेंबर : अचानक झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसामुळे विदर्भ (Vidharbha), पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अखेर 2 महिन्यानंतर केंद्राच्या पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची व भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकात एनडीएमएचे सहसचिव रमेशकुमार, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर बी कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक आर पी सिंग, मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गुरु-शनीची युती,भारतात या वेळेत पाहता येणार 397 वर्षांपूर्वीची खगोलशास्रीय घटना
अधिकाऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या टीम आज उस्मानाबाद व औरंगाबाद भागात पाहणी करून पंचनामे, छायाचित्र व स्थळपाहणी करणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा, लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, तुळजापूर तालुक्यातील काक्रबा, अपसिंगा व कात्री भागाची पाहणी करणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 881 शेतकऱ्यांच्या 2 लाख 59 हजार 255 हेकटर क्षेत्रातील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे. तसंच सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस पिकासह पपई, ऊस व फळबागांचे नुकसान झाले आहे.
तसंच पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तर अनेक घरांची पडझड झाली आहे. राज्य सरकारकरून पहिल्या टप्प्यात 133 कोटींची तुटपुंजी मदत तर भरीव मदतीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु,ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार होती. पण तत्पूर्वी राज्यात शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे. या आचारसंहितेमुळे राज्य सरकार पहिल्या हप्त्यात चार हजार कोटी रुपये भलेही मंजूर केले असले तरी वास्तविक खात्यात देणे आचारसंहितेच्या नियमांमुळे अडचण झाले असल्याने राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केले गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने मदत निधी वाटण्यास ठाकरे सरकारला परवानगी दिली होती.