जळगाव, 25 मे: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल येथून दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मागील अनेक महिन्यांपासून तिचे आजोबा तिला अनेक ठिकाणी शोधत होते. पण तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. पण बेपत्ता झाल्यानंतर दीड वर्षांनी पीडित मुलीनं फोन करून आपल्या आजोबांशी संवाद साधला. सोबतचं आपण उत्तर प्रदेशातील गोरखपूर याठिकाणी असल्याची माहितीही दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत उत्तर प्रदेशातून संबंधित मुलीला परत आणलं आहे. मुलीला घरी आणल्यानंतर तीनं आजीला पाहून हंबरडाच फोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय फिर्यादी आजोबांचं नाव भिमसिंग गंगाराम कोळी असून ते यावलमधील धोबीपाडा येथील रहिवासी आहेत. 19 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांची 11 वर्षांची नात अचानक गायब झाली होती. ती गायब झालेल्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. यावेळी वर्गात दप्तर ठेवल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर आली होती. तेव्हाच एका अनोळखी व्यक्तीनं तिला रिक्षात बसवून तिचं अपहरण केलं होतं.
हे ही वाचा-आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं; परिस्थितीपुढे हतबल तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
या घटनेनंतर तिला सर्वत्र शोधण्यात आलं. पण तिचा काही थांगपत्ता सापडला नाही. जळगावात राहणाऱ्या तिच्या आईकडे चौकशी केली असता, तिची आईही बेपत्ता असल्याचं समजलं. नात बेपत्ता झाल्यानंतर आजीची मानसिकताचं बिघडली होती. अशा स्थितीत 24 एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या मुलीनं आपल्या आजोबांना संपर्क साधला. यावेळी तिनं सांगितलं की, आपण उत्तर प्रदेशातील एका गावात असल्याची माहिती दिली. तसेच माझ्या आईचं पाच-सहा दिवसांपूर्वी निधन झालं आहे. बाबा माझे कपडे फाटले आहेत, मला चप्पलही नाही, तुम्ही मला कपडे आणि चप्पल पाठवा ना. हे ऐकल्यानंतर अश्रुंचा बांध फुटलेल्या आजोबांनी या घटनेची माहिती यावल पोलिसांना दिली.
हे ही वाचा-युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; आधी भररस्त्यात कपडे फाडले, मग...
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं पीडित मुलीचा पत्ता शोधून काढला. यावेळी स्थानिक पोलीस आजोबांना घेऊन मुलीकडे गेले. येथे गेल्यानंतर त्यांनी आजोबांना विचारलं, 'क्या यही है वो लडकी?' हा प्रश्न विचारल्यानंतर कोळी यांनी क्षणाचाही विचार न करता ट्विंकल म्हणून आवाज दिला. ट्विंकल आवाज ऐकू येताच, ती अल्पवयीन मुलगी पाण्याची बादली जागेवर सोडून बाऽऽबा... म्हणून ओरडत कोळी यांच्या अंगाला चिकटली. यानंतर तिला दोन दिवस प्रवास करून उत्तर प्रदेशातून जळगावात आणलं आहे. घरी आल्यानंतर आजीला पाहून तिनं हंबरडाचं फोडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jalgaon, Kidnapping, Uttar pradesh