परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत?

परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत?

परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कुलगुरूंबरोबर एक बैठक घेतली. त्यात कोणते महत्त्वाचे निर्णय झाले वाचा..

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकारची सूत्र हलायला लागली आणि बैठकींचं सत्र सुरू झालं. परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेऊ शकतो का याचा निर्णय आता सोमवारवर गेला आहे.

शनिवार असूनही उच्च आणि तंत्रशिश्रण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात अखंड बैठका सुरू आहेत. त्यात महत्त्वाची ठरली कुलगुरूंबरोबरची बैठक. दुपारी 1 वाजता राज्यातल्या सर्व कुलगुरूंबरोबर सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. ती परीक्षेसंदर्भातला निर्णय घेईल.

या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित कशा घेता येतील या संदर्भात महत्वाची चर्चा झाली. सोप्यातल्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यासंदर्भात उपाय सुचवले गेले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेपूर्वी मिळाला पाहिजे, अशीही भूमिका मांडण्यात आली. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण त्यांच्यावर परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी दबाव आणला जाणार आहे. त्यांची कुठलीही अडचण होणार नाही, याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असं सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितलं.

'30 सप्टेंबर दुपारी 12 पर्यंत  आम्ही परीक्षा घेऊ शकतो का ? याचा निर्णय येत्या सोमवारी परीक्षा समिती घेणार आहे. सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत परीक्षा समितीचा अहवाल येणार आहे', असं सामंत म्हणाले.

यानंतर संध्याकाळी चार वाजता माजी कुलगुरू वेरुळकर, विजय घुले तसेच उच्च शिक्षण विभागातील दोन्ही संचालक यांच्या सोबतही बैठक घेणार आहेत.

कुलगुरूंसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

- विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकणार नाही.

- विद्यार्ध्यांना अडचण होणार नाही याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करेल.

- विद्यार्थ्यांना सेंटरला बोलावून परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मत कुलगुरूंनी व्यक्त केलं.

- UGC ने सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन किंवा ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात चाचपणी

- 15 सप्टेंबरपर्यंत परीक्षाच घेऊ शकत नाही, असं गडचिरोली आणि चंद्रपूर मधल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं

- विध्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये अशीच पद्धती अवलंबावी असा आमचा प्रयत्न आहे.

- आमच्या बोलण्याचा विपर्यास कोणी करू नये, राजकारण होऊ नये. यामुळे विध्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 29, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या