बारामती, 13 मार्च : बारामतीत (Baramati) बागायतदार धनाजी जाचक यांच्या मुलाचे अपहरण (Kidnapping of a farmer's son) करून 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर अपहरण केलेल्या कृष्णराज धनाजी जाचक याची या आरोपींच्या तावडीतून सुटका केली आहे.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नामदेव चव्हाण व कृष्णराज धनाजी जाचक दोघेजण घरी जात होते. त्यावेळी वाटेत जळोची रोड पानसरे ड्रीम सिटीच्या बाजूला फिर्यादी पृथ्वीराज नामदेव चव्हाण व सोबत असणारे कृष्णराज जाचक यांची गाडी अडवून टोयाटा कंपनीच्या इटियॉस कारमधून आलेल्या 4 अज्ञात आरोपींनी या दोघांची गाडी अडवली. त्यानंतर फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करून कृष्णराज जाचक याला जबरदस्तीने अरोपींनी गाडीत घालून पळून नेले. तसंच जाताना आमच्या फोनची वाट पाहा, असं फिर्यादीला सांगितलं. त्यानंतर काल शुक्रवारी रात्री 09:37 च्या दरम्यान मुलगा कृष्णराजच्या मोबाईल वरून या चार अरोपींपैकी एकाने वडील धनाजी जाचक यांना फोन केला.
"आपण एका तासाच्या आत 5 कोटी रुपये द्या, नाहीतर आपल्या मुलाला मुकाल," अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या फोनमुळे धनाजी जाचक यांना धक्काच बसला. एकुलता एक मुलगा आणि आता एवढी मोठी रक्कम एका तासाच्या आत आणायची कोठून? असा प्रश्न त्यांना पडला.
हेही वाचा - भयंकर! इंजिनिअरिंग कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून बेल्टने मारहाण, हॉस्टेलमधूनही काढलं
त्यानंतर याची फिर्याद पृथ्वीराज चव्हाण यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मोबाईल टॉवरचे लोकेशन घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. शिवाय ठिकाण ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. ज्या ठिकाणाहून अपहरण करण्यात आले त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासल्यानंतर या आरोपींचा माग लागला आणि बारामती पोलिसांनी अपहरण केलेल्या कृष्णराज जाचकची सुटका केली. तसंच आरोपींना पकडले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.