'नागरिकत्व'वरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी, नगरसेवकाने पळवला राजदंड

'नागरिकत्व'वरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी, नगरसेवकाने पळवला राजदंड

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरूवारी जळगाव महापालिकेच्या महासभेत उमटले.

  • Share this:

जळगाव,19 डिसेंबर: नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरूवारी जळगाव महापालिकेच्या महासभेत उमटले. भाजपने विधेयकाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेत प्रचंड गदारोळ केला. शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी 'एनआसीला पाठिंबा देणार्‍यांचा धिक्कार असो', अशा घोषणा करत चक्क राजदंड पळवला. यामुळे गोंधळात आणखी भर पडली. यावर भाजप सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत इब्राहिम पटेल यांना निलंबित करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची गुरुवारी सकाळी 11 वाजता महासभा होती. सभेला उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीलाच नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्यात येत होते. यावेळी भाजपच्या वतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरून उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी सभेच्या व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत 'नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध असो', 'भारतीय संविधानाचा विजय असो', 'हिंदू-मुस्लिम भाई भाई', अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात न आल्याने गोंधळ उडाला. मात्र, हा प्रकार भाजपच्या काही नगरसेवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी धावत जाऊन राजदंड पळवणारे इब्राहिम पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडले. त्यांच्या हातून राजदंड हिसकावून घेत भाजपच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', अशा घोषणा दिल्या.

सभेपुरते केले निलंबित..

शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी राजदंड पळवल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. त्यानंतर महासभा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आहे. पटेल यांच्यासह एमआयएमचे रियाज अली यांना देखील आजच्या सभेपुरता निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या