महाडसारखी आणखी एक दुर्घटना होण्याची भीती, जालन्यात इमारतीचा कॉलम खचला

महाडसारखी आणखी एक दुर्घटना होण्याची भीती, जालन्यात इमारतीचा कॉलम खचला

महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने इमारतीत वास्तव्य असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • Share this:

जालना, 28 ऑगस्ट : महाड येथील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच जालन्यात देखील एका 3 मजली इमारतीचा कॉलम खचला असून इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. जालन्यात देखील महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने इमारतीत वास्तव्य असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

जालना शहरातील कॉलेज रोड या मध्यवस्तीत शुभम विला नावाची ही इमारत असून या इमारतीत 30-40 लोक वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या पाया खिळखिळा झाला आऊन पिलर पूर्णपणे खचून गेला आहे. इमारतीतील घरांच्या भिंतींना ठिकठिकाणी भेगा पडल्या असून छतालाही तडे गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच या तीन मजली इमारतीवर बेकायदेशीररित्या एक मजला वाढवून तीन अतिरिक्त फ्लॅट बांधण्यास सुरुवात करण्यात आली.

या बांधकामामुळे इमारतीचा पिलर खचून निकृष्ट बांधकामाचं पितळ उघडं पडलं. याप्रकरणी इमारतीतील रहिवाश्यांनी बिल्डरकडे जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना हाकलून लावण्यात आल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे.

जालन्यात देखील महाड दुर्घटनेची पुनरावृत्तीची शक्यता असल्याने रहिवाश्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, नगरपालिकेने तीन अभियंत्यांच्या समितीमार्फत इमारतीचा सर्वे केला असून इमारत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. रहिवाश्यांना इमारत खाली करण्याची नोटीस दिली असून वेळप्रसंगी इमारत पांडण्याची तजवीज केल्याचं मुख्याधिकारी नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 28, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या