LIVE : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस

LIVE : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस

1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

  • Share this:

06 जून : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पाच दिवसांनंतरही या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक घटल्याने भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रबंदच्या आंदोलनात सामान्य शेतकऱ्यांपेक्षा राजकीय पक्षाचे नेते आघाडीवर होते.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण भाजपसोबत गेले अडीच वर्ष सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शिवसेनेप्रमाणे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचा बंद करण्यात पुढाकार होता. संपाच्या निमित्ताने सर्वत्र भाजप विरोधात शिवसेना हे चित्र सर्रासपणे जागोजागी दिसलं.

इचलकरंजीत खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चा काढला.  धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पाटील यांनी आंदोलन केलं. जळगावात रावेरला शिवसेनेचे प्रल्हाद महाजन, मुक्ताईनगर इथं शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, यांनी आंदोलन केलं. नाशिक ग्रामीणमध्ये इथं कम्युनिस्ट पार्टीकडून, तर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पाटील यांनी आंदोलन केलं.  भाजप वगळता सर्वच पक्षानी या संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी संपात घुसलेल्या या राजकारण्यांवर काय कारवाई करतात ते बघावं लागणार आहे.

जालना:

जालन्यामध्ये शेतकरी संपाच्या आजच्या सहाव्या दिवशी जाफराबाद तालुक्यातला सर्वात मोठा आठवडी बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला. जाफराबादच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी आंदोलकांनी दुग्धाभिषेक घातला. या आंदोलनात जाफराबाद, टेंभुर्णी, वरूड, पिंपळखुटा, निमखेडा, कुंभारझरी, हिवराबळी इथल्या 150 ते 200 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

बुलडाणा :

बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलन करीत असून, शेतकरी संप ला भरभरून पाठिंबा देण्यासाठी सर्व शक्तीनिशी कम्युनिस्ट पक्ष जोरदार नारेबाजी करीत आहे. गेल्या तासभरापासून बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील उपविभागीय कार्यालयावर अनेक कॉम्रेड सरकार विरोधी नारे देतायेत..  शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि स्वामिनाथन आयोग लागू झालं पाहिजेच्या घोषणा आंदोलनकर्ते देत आहेत.

पुणतांबा : 

संपाचा सहावा दिवस असला तरीही पुणतांब्यात सरकारविरोधाची धार कायम दिसतेय तर आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारचं दहावं घातलं आहे. तसंच त्यांनी शासकीय कार्यालयांना  टाळं लावलं .पुणताब्याच्या शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संपकरी शेतकऱ्यांनी दिला आहे.

सोलापूर :

शेतकऱ्यांनी सोलापूरमध्येही आंदोलन केलं. सोलापूर- विजापूर बायपास महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. दुधाचा कॅन आमि जनावरांसह शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी दूध संकलन सुरळीत झालं. जिल्ह्यातल्या गोकुळ, वारणा या दूध संघानी मिळून 7 लाख लिटर दूध संकलित केलं. आज दुपारी गोकुळचे 8 टँकर मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर वारणाचे 5 टँकर पहाटे 5 वाजता मुंबईला रवाना झाले. काल महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या गोकुळ, वारणा, स्वाभिमानी या दूध संघांनी संकलन पूर्णपणे बंद ठेवत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता. तर, कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये आज भाजीपाला आणि फळांची मोठी आवक झालीय. शेतकऱ्यांचा संप सुरू असला तरी आज बाजार समितीत सौदेही पार पडले..

वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई - सुभाष देसाई

शेतकरी संपाचा राजकीय हेतून फायदा विरोधक घेत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतोय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या बाजार समित्या याचा हत्यार म्हणून उपयोग करतंय. यावर सहकार आणि पणन मंत्र्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. आठमुठी धोरण अवलंबून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसंच कारवाई करत तातडीनं त्या बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात येईल असा इशारा सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

First published: June 6, 2017, 9:25 AM IST

ताज्या बातम्या