खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

हनुमंत पवार यांच्याकडे मात्रेवाडी इथं २ एकर शेती होती. त्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये गावातीलच खाजगी सावकार बालम वसुदेव खंडागळे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतलं होतं.

  • Share this:

भूम, 25 फेब्रुवारी : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सावकरी पाशाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हनुमंत त्रिंबक पवार (वय ५५) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी खासगी सावकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हनुमंत पवार यांच्याकडे मात्रेवाडी इथं  २ एकर शेती होती. त्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये गावातीलच खाजगी सावकार बालम वसुदेव खंडागळे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतलं होतं. या पैश्यापोटी त्या सावकाराने हनुमंत पवार यांच्याकडून २ एकर जमीन पत्नीच्या नावे खरेदी लिहून घेतली होती.  त्या पैश्याच्या पोटी आरोपी बालम खंडागळे हा पवार यांना सतत फोन करून पैश्याची मागणी करून त्रास देत होता. मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे  ३ वाजेच्या सुमारास  बालम खंडागळे हा पवार यांच्या घरी आला आणि त्यांना शिवीगाळ करत मयत, त्याची पत्नी आणि मुलगा यांना झोपेतून उठवले आणि तात्काळ इथून निघून जा असं सांगितलं. तसंच  त्याच्या मुलाला मारहाण केली.आणि घरातील संसारोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून दिलं.

यावेळी पवार यांच्या मुलाने, भाऊ दिलीप पवार यांना फोन करून बोलावून घेतलं. दिलीप पवार हे सोडवासोडव करत असताना गावातीलच रामदास तुळशीराम खंडागळे , हरिदास तुळशीराम खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई बालम खंडागळे हे तेथे आली आणि पवारांच्या कुटुंबाला 'आमचे पैसे द्या नाहीतर तुम्हाला जीवे सोडणार नाही' अशी धमकी दिली.

दिलीप पवार यांनी भाऊ,भावजयी आणि पुतण्या यांना गावाकडे नेलं. सकाळी झोपेतून उठून साधारण ६ वाजण्याच्या सुमारास पवार हे गाईचे दूध काढण्यासाठी शेतात गेले.  पण, बराच वेळ झाला ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने जाऊन पाहिले असता  हनुमंत पवार यांनी शेताच्या बांधावरील लोखंडीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

या प्रकरणी मयताचा भाऊ दिलीप पवार यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात बालम खंडागळे, अंकुश खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई खंडागळे ,हरिदास खंडागळे ,रामदास खंडागळे या सहा जणांच्या विरोधात कलम ३०६ , ३२३ , ५०६ , १४३, १४७ ,१४७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गडवे हे करत आहेत.

First published: February 25, 2020, 10:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading