अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकऱ्यानं कीटकनाशक पिऊन केली आत्महत्या

अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकऱ्यानं कीटकनाशक पिऊन केली आत्महत्या

सोलापूर येथे कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

  • Share this:

सोलापूर, 7 मे : राज्यात दृष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत जात आहे. दुष्काळाच्या या दृष्टचक्रात शेतकऱ्यांचे नाहक बळी जात आहेत. शुभ मुहूर्त म्हणून मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशीही एका शेतकऱ्यानं आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. ही दुर्दैवी घटना सोलापुरातील आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून तुकाराम माने या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. माने हे मोहोळ तालुक्यातील येनकी गावचे रहिवासी होते. विषारी कीटकनाशक पिऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या शेतकऱ्यावर युनियन बॅंकेचे 12 लाख रूपयांचे कर्ज होते.

दुष्काळात ऊस जळून गेल्यानंतर आता डाळिंबाची बागही जळण्याच्या मार्गावर असल्याने माने यांनी नैराश्य आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. राज्यात मागील काही दिवसांमध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र वाढलं आहे. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्याचं दिसून येत आहे.

भीषण दुष्काळ

राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. पाण्यासाठी होणारी वणवण देखील वाढली आहे. सर्व मदार आता पाणी टँकरवर आहे. पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकांचं नुकसान झालं. तर, पाण्याअभावी रब्बी पिकं देखील करपून गेली. शिवाय, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.

या साऱ्या बाबींमुळे आता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नापिकीमुळं कर्ज देखील वाढत आहे. या साऱ्यातून सुटका करण्यासाठी बळीराजा आता आत्महत्या करताना दिसत आहे. यापूर्वी देखील वाशिम येथे तरूण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. मागील चार दिवसांमध्ये जवळपास 4 ते 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

VIDEO: अबकी बार फिर भाजप सरकार? प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

First published: May 7, 2019, 2:49 PM IST
Tags: farmer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading