चिपळूण, 30 सप्टेंबर: कोकणात राजकीय गोटात पुन्हा बदलाचे वारे वाहू लागले आहेत. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम प्रदीर्घ काळानंतर पुन्हा स्वगृही परतले आहे. अर्थात रमेश कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रमेश कदम यांच्या पक्षातरामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हेही वाचा.....तर न्यायालयावरील विश्वास उडेल, 'बाबरी मशीद विध्वंस'वर आंबेडकरांच परखड मत
रमेश कदम हे भास्कर जाधव यांचे कट्टर विरोधक आहेत. राष्ट्रवादीमधील पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकारणाला कंटाळून रमेश कदम हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही महिन्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. मात्र, अचानक रमेश कदम यांचा जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आला होता. त्यामुळे कदम नाराज झाले होतं.
पक्ष वाढीसाठी मोठा फायदा...
रमेश कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे चिपळूणमधील पक्षवाढीसाठी मोठा फायदा होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण राजकारणाचा अनुभव आणि अभ्यासू वृत्तीमुळे जिल्ह्यात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील अनेक वर्षे रमेश कदम आणि भास्कर जाधव यांच्या खुला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात आगामी काळात आणकी काय पाहायला मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला भास्कर जाधव यांची दांडी
दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेना नेते भास्कर जाधव याची नाराजी अद्याप कायम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या कोकणातील शिवसेना आमदारांच्या महत्त्वाच्या बैठकाला आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली.
हेही वाचा...बाबरी मशीद विध्वंस हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण- माधव गोडबोले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.