मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना घातला गंडा, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना घातला गंडा, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

'तुमच्या गाडीत ड्रग्स सापडलं', असं सांगून अमेरिकन लोकांना लुटणाऱ्या भामट्यांना पकडलं...

  • Share this:

नालासोपारा, 29 ऑक्टोबर: मुंबईपासून जवळच असलेल्या नालासोपारा (पश्चिम) कडील श्रीप्रस्थ येथे बसून सातासमुद्रापलीकडे असलेल्या अमेरिका देशातील नागरिकांना गंडा घालणारे बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकारामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

'तुमच्या गाडीत ड्रग्स सापडलं', असं सांगून अमेरिकन लोकांना लुटणाऱ्या 7 पुरुष आणि 3 महिला असे 10 भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच 9 लॅपटॉप, 9 हेडफोन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा...उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्त्वाचे निर्णय

नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था विभागातील यशवंत गौरव मधील सुंदरम प्लाझा इमारतीच्या सदनिका नंबर 103 मध्ये बॅसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाचे हे बनावट कॉल सेंटर 25 दिवसांपूर्वीच थाटले होते. त्यामध्ये 15 दिवस ट्रेनिंग देऊन 10 दिवसांनी त्याच आरोपींना कामावर रुजू करून घेतले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना महितीदाराने बनावट कॉल सेंटरबाबत माहिती दिली होती. यानंतर वरिष्ठांना माहिती देऊन पोलीसांची टीम बनवून छापा घातला आहे. प्रकाश दीपक बॅनर्जी (34), जयेश गोपाल पडाया (24), चंदन यशवंत आमीन (24), भरत नारायण भाटी (30), ओमकार नितीन काळे (20), सनीत सुभाष कपाडे (20), कोमल तानाजी बघाडे (19), मुस्कान वाजीद हुसेन (19), प्रांजल पियुष शिंदे (28), चंन्द्रेश मनोहर विश्राम (24) अशी आरोपींची नावं आहेत.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते आणि वसई विरार परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील, सहाययक पोलीस उपायुक्त अमोल मांडवे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे आणि 10 ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह संध्याकाळपासून बनावट कॉल सेंटरवर छापा घालण्यासाठी सापळा लावून बसले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कॉल सेंटरवर छापा घातला. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..मुंबईत लोकल सुरू होणार पण.., रेल्वेचं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर

महितीदाराने माहिती दिल्यावर नालासोपाऱ्यातील बनावट कॉल सेंटरवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्री छापा घातला आहे. 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 9 लॅपटॉप, 9 हेडफोन आणि अमेरिकन नागरिकांसॊबत बोलण्यासाठीचे स्क्रिप्ट जप्त केले असल्याची माहिती वसई परिमंडळांचे सहायक पोलीस उपायुक्त अमोल मांडवे यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 29, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या