पुणे, 9 नोव्हेंबर: राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केल्याचं पहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
'शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,' असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावरून वाद निर्माण होताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'त्या काळात आपण माधुकरी मागून शिकलो, माधुकरी म्हणजे काय तर भिक मागणे. भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे हे तुम्हाला माहित आहे का? भीक मागून मी माझी संस्था वाढवली हा प्रचलीत शद्ब आहे. यात मी काय चुकीचं बोललो? उलट मी त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठीच बोललो, मात्र विरोधक ध चं मा करतात. आता मला मुक्याची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही अडचणी आहेत. कारण विरोधकांकडे दुसरं कामच उरलं नाही' असं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
हेही वाचा : 'शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली', चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान
काँग्रेसला टोला
दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून, आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राजकारण सुरू आहे, सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Congress, NCP, Shiv sena