EXCLUSIVE : नवी मुंबईत नागरिकांनी हाणून पाडला भूखंड हडपण्याचा डाव

EXCLUSIVE : नवी मुंबईत नागरिकांनी हाणून पाडला भूखंड हडपण्याचा डाव

बेलापूरमधील (Belapur) नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस हा तलाव आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 12 मार्च : नवी मुंबईत (Navi Mumbai) डेब्रिज माफियांनी चक्क तलावामध्येच डेब्रिज टाकून बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. नेरुळमधील हा तलाव लोटस नावाने प्रसिद्ध आहे. बेलापूरमधील (Belapur) नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस तलाव आहे. या तलावाच्या शेजारी सिडकोच्या मालकीचा भूखंड आहे. या भूखंडावर डेब्रिज टाकण्यासाठी सिडकोने महापालिकेकडे रीतसर परवानगी मागितली होती.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याबाबतची परवानगी देताना पाणथळ जागेमध्ये डेब्रिज टाकू नये या शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार या भूखंडावर भरणीचे काम सुरू होते. मात्र हे काम सुरू असतानाच डेब्रिज माफियांकडून तलावात देखील बेकायदेशीर रित्या डेब्रिज टाकून तलाव बुजवण्याचा काम सुरू होतं. मात्र ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला.

याबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यापर्यंत पोहोचल्या. आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाड टाकली. प्रत्यक्ष पाहणीमध्ये सदर पाणथळ जागेच्या बाजूला डेब्रीज टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सध्या डेब्रीज टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सदर परवानगीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणथळ जागेमध्ये डेब्रिज टाकण्यात येऊ नये असे नमूद केलेले असताना त्यावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी ही डेब्रिज भरारी पथकाची होती.

हेही वाचा - व्यापाऱ्याने थेट हॉटेलमध्येच गळफास घेऊन केली आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

त्यामुळे त्यांनी पर्यवेक्षण कामात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं आहे.

नवी मुंबईच्या अनेक भागात अशाच पद्धतीने भराव टाकून जागा हडप केल्या जातात. मग त्या कांदळवनातील जागा असो किंवा पाणथळे बुजवून झोपड्या किंवा चाळी उभारून भूमाफियांनी अनेक भूखंड अशाच पद्धतीने हडपले आहेत. मात्र आज महापालिकेच्या मुख्यालयाच्या मागील बाजूस म्हणजेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत भूमाफिया भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सतर्क नवी मुंबईकरांमुळे भूमाफियांचा हा प्रयत्न हाणून पडला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 12, 2021, 12:17 AM IST
Tags: police

ताज्या बातम्या