सांगली, 10 मे : रयत क्रांती संघटनेच्या (Rayat Kranti Sanghatana) वतीनं मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्यव्यापी आंदोलनाला (Agitation) सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या अपयशामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नसल्याची टीका करत खोत यांनी आंदोलन सुरू केलंय. सांगलीत (Sangli) इस्लामपूर इथं कुटुंबीयांसह घराच्या समोर निदर्शनं करत त्यांनी या मुद्द्यावरून सरकारचा निषेध केला. तसंच सरकारवर हल्लाबोलही केला.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने लढा देत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यासाठी न्यायालयीन लढा हा योग्य पद्धतीनं लढण्यात आला. पण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनं फडणवीसांनी मिळवून दिलेलं मराठा आरक्षण धुळीत मिळवलं, अशी टीका सदभाऊ खोत यांनी केली.
(वाचा-उजणीचं पाणी पेटलं, मंत्र्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी भिडले, LIVE VIDEO)
मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला आणि महाविकास आघाडी सरकार गेलं काशिला अशा घोषवाक्याने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या पद्धतीनं आरक्षणासाठी बाजू मांडायला हवी होती, तशी मांडली गेली नाही, यामुळं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही असं खोत म्हणाले. मराठा समाज खेड्या पाड्यात राहणारा, शेतीत राबणारा अल्पभूधारक असा आहे. त्यामुळे मराठा समाजानं आरक्षणाची न्याय मागणी मांडली होती.
(वाचा-कोरोनाकाळ आणि लग्नही जमत नाही! मानसिकरित्या खचलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल)
फडणवीस यांनी हे आरक्षण मिळवून दिलं होतं. पण प्रस्थापित मराठ्यांना हे आरक्षण नको होतं. कारण आरक्षण मिळालं असतं तर प्रस्थापित मराठे विस्थापित मराठ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. तसं झालं तर आमच्या सुभेदाऱ्या धोक्यात येतील अशी भीती असल्यानं मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही अशी टीका खोत यांनी केली. मात्र मराठा समाज आता जागा झाला असून सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल, असंही खोत म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सद्या आंगणामध्ये कुटुंबीयांसह हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे राज्यव्यापी आंदोलन सुरू राहणार असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.