मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका होणार, आयोगानी दिली परवानगी

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका होणार, आयोगानी दिली परवानगी

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती.

  • Share this:

मुंबई, 1 मे : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रकारची खबरदारी घेवून ही निवडणूक घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. आमदारकीवरून राजकीय पेच निर्माण झाला असतानाच निवडणूक आयोगाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू होती. या बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले होते. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर होते.

या बैठकीत महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.

दरम्यान, विधानपरिषदेच्या या 9 जागांसाठी 27 मे आधीच निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

उद्धव ठाकरेंसमोर कसा निर्माण झाला होता राजकीय पेच?

उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर 6 महिने राहता येतं. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला.

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांवरील निवडणुका तहकूब करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाकडून करण्यात आली होती. पण त्यावर अद्याप राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नव्हता. मात्र आता विधानपरिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या माध्यमातून विधीमंडळाचे सदस्य होण्याची शक्यता आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First Published: May 1, 2020 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading