मुंबई, 9 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला, तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना आता नुसतं शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. दोन्ही गटांना शिवसेना या नावाच्या मागे किंवा पुढे आणखी कोणतं तरी नाव लावावं लागणार आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे, असं असलं तरी हा आमच्यावर झालेला अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
'निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थानिक लोकांनी गळे काढू नये. बहुमत असूनही आमचा दावा नाकरला गेला आहे, त्यांनी सतत आयोगाकडे फक्त तारखा मागितल्या. कागदपत्र सादर केली नाहीत, त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे आम्ही आजही आमच्या मागणीवर ठाम आहोत,' असं दीपक केसरकर म्हणाले.
'आम्ही प्रतिज्ञापत्र कधी दिली, याच्या सगळ्या नोंदी आहेत. आज आमचं चिन्ह गोठवलं गेलं आहे, त्यांनी अन्य पर्याय तयार ठेवले आहेत. आम्ही तसं काहीही केलेलं नाही. लोक कोणाला मतदान करतात, कोण निवडून येतं आणि मग ते कोणासोबत जातात? एकासोबत निवडून आल्यावर दुसऱ्यासोबत जाणं यामुळे लोकशाहीची हत्या होते,' असं वक्तव्य केसरकर यांनी केलं.
'आज जी आरडाओरड सुरू आहे, ती फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब लोकांच्या सहानुभूतीवर कधीच अवलंबून नव्हते. बाळासाहेबांच्या कौतुकाचा हात नेहमीच शिंदेंच्या पाठीशी होता, म्हणून त्यांना त्रास देणं सुरू होतं,' असा आरोप केसरकर यांनी केला आहे.
शिंदेंची पुढची रणनीती
निवडणूक आयोगाने दिलेल्या या निकालाविरुद्ध आम्ही दाद मागणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. 'सध्या फक्त केळव सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून तोडून दाखवल्या जात आहेत, त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला भुलू नये. खोटी कागदपत्र पोलिसांनी पकडली आहेत. आतो भावनिक पोस्ट टाकत आहेत, त्याऐवजी 2.5 वर्षात लोकांची भेट घेतली असती तर आज ही वेळ आली नसती,' अशी टीका केसरकर यांनी ठाकरेंवर केली.
आदित्य ठाकरेंवर निशाणा
'आदित्य ठाकरे खोक्यांचं ट्वीट करत आहेत, कारण त्यांना खोक्याचीच सवय आहे. हा शब्द त्यांना जवळचा आहे. आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यानंतर लोकहिताचे 700 निर्णय घेतले. ते दिवसरात्र फिरून काम करत आहेत. अंधेरीतून कोण निवडणूक लढवणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. तो निर्णय शिंदे-फडणवीस एकत्र बसून लढवतील. मुरजी पटेल यांचं नाव तुम्ही सांगत आहात, पण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही,' असं दीपक केसरकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray