मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या पण तुमची दुकानं सुरु', एकनाथ शिंदेंच धक्कादायक विधान

'मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या पण तुमची दुकानं सुरु', एकनाथ शिंदेंच धक्कादायक विधान

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसीच्या मैदानावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसीच्या मैदानावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. 'तुम्ही कोरोना काळाच सर्वसामान्य गरिबांची दुकानं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमचे दुकानं सुरु होती', असं धक्कादायक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही दुकानं म्हणजे नेमकी काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शंभर कोटी घोटाळ्यांच्या प्रकरणी अजूनही जेलमध्ये आहेत. त्यामुळे शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे होता? आणि त्यांनादेखील अशाच कोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं होतं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे शिंदे यांनी संबंधित आरोप केला असला तरी त्यांनी त्यावर खोलवर भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे ते समजू शकलेलं नाही.

"तुम्ही आज सांगता की भाजपसोबत जायचं होतं तर राजीनामा देऊन जायचं होतं. २०१९ साली जेव्हा तुम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत गेले तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का? तुम्ही जनादेशाच्या विरोधात गेले. जनतेच्या मनाविरुद्ध तुम्ही गेले. तेव्हा राजीनामे दिले? अडीच वर्षात तुम्ही कितीवेळ मंत्रालयात गेलात? अडीच वर्षात फक्त अडीच तास? कसं सरकार चालणार? कसा कारभार चालणार? तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करुन दुकानं बंद केलीत. मंदिरं बंद केलीत, बाजारपेठा बंद केलात पण तुमची दुकानं मात्र सुरु होती. काय कसली होती ती मी बोलत नाही. पण चालू होतं ते मला माहीत होतं. माझ्याशिवाय जास्त कुणाला माहीत असणार?", असा धक्कादायक दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

('आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची', ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार)

"तुम्ही आम्हाला गद्दार टाहो फोडण्यापेक्षा लाखो शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार-खासदारांनी तुम्हाला का सोडलं? याचं तुम्ही आत्मपरिक्षण करा. तुम्ही आतापर्यंत पाहिलं तर राज ठाकरे, नारायण राणे अनेक लोकं गेले. इथे निहार ठाकरे, स्मिता वैनी बसले आहेत. मग कोण कोण चुकीचं? सगळे आम्ही चुकीचे? तुम्ही एकटे बरोबर? तुम्ही आत्मपरिक्षण करणार की नाही, फक्त चौकटीत राहून सूर्य पश्चिमेला उगवतो सांगायचं आणि ते मानायचं? असं एकनाथ शिंदेंनी कधी केलं नाही. एकनाथ शिंदेने राज्याच्या फायद्याचं सांगितलं ते तुम्हाला आवडलं नाही. परवडलं नाही. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पूर्ण करायची होती त्यासाठी तुम्ही शिवसेनेचं जे पानीपत होत चाललं होतं ते उघड्या डोळ्याने पाहत होता", असं शिंदे म्हणाले.

"कुठल्या परिस्थितीत शिवसेना-भाजपचं सरकार आलं ते सर्वांना माहिती आहे. आम्हाला निर्णय घ्यावा लागला तो काही आम्ही आनंदाने घेतला? निर्णय घेताना आम्हालाही वेदना झाल्या, आम्हालाही वाईट वाटलं. गेले अडीच वर्ष जी खदखद होती तिचा उद्रेक कधीतरी होणारच होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी जूनमध्ये उद्रेक झाला. त्याची दखल जगातील ३३ देशांनी घेतला. कारण हे परिवर्तन, हा उठाव क्रांती होती. इंग्रजांविरोधात 1857 साली आपल्या लोकांनी जो उठाव केला ती देखील स्वराज्य मिळवण्यासाठी क्रांती होती. त्यामुळे आम्हाला देखील या महाराष्ट्राला अन्यायग्रस्त लोकांच्या जोखडातून मुक्त करायचं होतं. म्हणून आम्ही हे धाडसी पाऊव उचललं. हे पाऊल उचलणं येड्या-गबाळ्याचं काम नाही. हा एकनाथ शिंदे जनतेच्या सेवेसाठी अखंड काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जीवाची पर्वा नाही. कारण वेडेलोकंच इतिहास घडवतात", असंदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

First published:

Tags: Eknath Shinde, Shiv sena dasara melava