मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कटप्पा ते पाठीत खंजीर, शिंदेंचं ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर

कटप्पा ते पाठीत खंजीर, शिंदेंचं ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कटप्पा असा उल्लेख केला होता. त्यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बड्या नेत्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे दोन वेगवेगळ्या मैदानावर दसरा मेळावे पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कटप्पा असा उल्लेख केला होता. त्यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. "ते भाषणात मला कटप्पा म्हणाले. अरे कटप्पा पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? शिवसैनिकांना त्रास देताय? अरे असं बोगस काम आम्ही करणार नाहीत. आम्ही समोरुन वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत", असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.

"तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी आमचे शिवसैनिक जेलमध्ये गेले, तडीपार झाले, त्यांच्यावर मोक्का लागले, आनंद पवार अक्षरश: ढळाढळा रडले. त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले? आम्हाला काय सांगता? हे सरकार कुणावही अन्याय करणार नाही. मी जाहीरपणे पोलिसांना सांगू इच्छितो, आम्हाला कुणावरही अशाप्रकारचा अन्याय करुन पक्षामध्ये सामील करुन घ्यायचं नाही. आज एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय हा साक्षी आहे. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे, असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही करणार", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

"त्यांनी गद्दारी केली त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडला होता की, अरे बापरे आता पुढे काय? पण माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. आज शिवतीर्थ बघून पुन्हा त्यांना प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाडे देऊन आलेला नाही. वृद्ध, दिव्यांग लोकं आले आहेत. गावावरुन पायी चालत लोकं आहेत. तिथे एक आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता कितीचा झाला? आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

('मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या पण तुमची दुकानं सुरु', एकनाथ शिंदेंच धक्कादायक विधान)

"वाईट एका गोष्टीचा वाटतो आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो, मी बोललो नाही तुमच्याशी, माझे बोटंही हलत नव्हते, शरीर पूर्ण पडलं होतं. ते कटप्पा, हो कटप्पा म्हणजे कट करणारे अपत्य म्हणजे कटप्पा हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही, आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कुणाला कल्पना नाही की हा फक्त उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ही शक्ती माझ्या आई जंगदंबेने दिली आहे. त्या शक्तीशी तुम्ही पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. पण तेजाचा एक शाप असतो तो तेजाचा शाप आहे", असं उद्धव म्हणाले.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray