'जय महाराष्ट्र' म्हणत एकनाथ खडसेंनी दिला 'वेगळा विचार' करण्याचा भाजपला इशारा

'जय महाराष्ट्र' म्हणत एकनाथ खडसेंनी दिला 'वेगळा विचार' करण्याचा भाजपला इशारा

'गेली 40 वर्ष पक्षासाठी खूप केलं, त्याबद्दल पक्षानेही खूप काही दिले. काहीच नसताना चार दिवसांमध्ये माझ्यावर आरोप झाले आणि लगेच कारवाईही करण्यात आली'

  • Share this:

जळगाव, 07 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत खडसे यांनी रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दलचे पुरावे सादर केले आहे. हे पुरावे अमित शहा यांच्याकडे सादर होणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. तसंच जर वारंवार अत्याचार होत राहिले तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही खडसेंनी दिला.

उत्तर महाराष्ट्रातील तिढा सोडवण्यासाठी जळगावात  भाजप कोअर कमिटीच्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांची बंददाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मुक्ताईनगर मतदारसंघातील निवडणुकीबद्दल सविस्तर चर्चा झाली. रोहिणीताई खडसे यांच्या मतदारसंघात काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधी काम केलं. त्याबद्दल जे काही पुरावे होते. यात फेसबुक पोस्ट, ऑडिओ कॉल आणि  आणखी काही पुरावे हे पाटील यांना दिले. याबद्दल हे पुरावे माध्यमांमध्ये जाहीर करण्याची परवानी द्यावी अशी मागणी पाटील यांच्याकडे केली होती. परंतु, त्यांनीही हा वाद पक्षातला आहे, असं सांगत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे.पी.नड्डा, भुपेंद्रसिंह यादव यांच्याकडे पुरावे मांडणार आहे. जर त्यांनी बोलावलं तर सोबत जावू, असं आश्वासन पाटील यांनी दिलं, असं खडसे यांनी सांगितलं.

अशांची काय आरती ओवळायची का?

मी कधीच ओबीसीवर अन्याय झाला असं म्हटलं नाही. परंतु, ओबीसी नेत्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोठं काम केलं आहे विसरून चालणार नाही. गेली 40 वर्ष पक्षासाठी खूप केलं, त्याबद्दल पक्षानेही खूप काही दिले. काहीच नसताना चार दिवसांमध्ये माझ्यावर आरोप झाले आणि लगेच कारवाईही करण्यात आली. माझ्यावरच नाहीतर गोपीनाथ मुंडे यांना टार्गेट केलं होतं. कुणी आपल्या स्पर्धेत येऊ नये म्हणून काम केलं गेलं. मग अशांची काय आरती ओवळायची का? असा संतप्त सवालही खडसेंनी उपस्थितीत केला.

'...तर मला वेगळा विचार करावा लागेल'

तसंच मी पक्ष काही सोडणार नाही. गेली 40 वर्ष या पक्षाला दिली त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाही. मला निर्णय प्रक्रियेत काढून टाकण्यात आलं. मला कोअर ग्रुपमधून काढून टाकलं, कोणत्याही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. असं जर वारंवार करत असाल तर मी काही देव नाही. मीही शेवटी माणूस आहे. माझ्यावर असाच अत्याचार होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

गिरीश महाजनांचं खडसेंना आव्हान

दरम्यान, गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना वाटत असेल, त्यांच्याकडे पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी माहिती असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. स्वत: एकनाथ खडसे या मतदारसंघात यापूर्वी किती मतांनी निवडून आले हे अभ्यासले पाहिजे. या निवडणुकीत एक वेळ ते स्वत: उमेदवार असते तर निवडून आले असते, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या