Home /News /maharashtra /

एकनाथ खडसेंच्या होमपिचवर भाजपची पुन्हा पक्षबांधणी, पण.. गिरीश महाजनांची दांडी

एकनाथ खडसेंच्या होमपिचवर भाजपची पुन्हा पक्षबांधणी, पण.. गिरीश महाजनांची दांडी

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता

भुसावळ, 29 ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचं होमपिच असलेल्या मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपची पक्षबांधणीसाठी गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. मात्र, भाजपचे आमदार गिरीश महाजन अनुपस्थीत होते. एवढंच नाहीतर या बैठकीला बहुतांश कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. भाजपसाठी पुढील वाटचाल अवघड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईला महत्त्वाचं काम निघाल्यामुळे गिरीश महाजन यांना बैठकीला उपस्थित राहाता आलं नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. हेही वाचा...राज्यपालांवर कुत्सित टीका करणं जाणत्या राजाला शोभत नाही, भाजपचा पवारांवर पलटवार एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून भाजपनं कंबर कसली आहे. पक्षबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली. जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर लगेचच गुरुवारी सांयकाळी 5 वाजता भाजपनं थेट एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक घेतली. या बैठकीला गिरीश महाजन यांनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. पण, गिरीश महाजन आजपर्यंत मुक्ताईनगर येथील एकाही बैठकीला उपस्थित राहिलेले नसल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात मतभेद होते, असंही बोललं जात आहे. जळगावच्या बैठकीला सूनबाईंची दांडी... दरम्यान, भाजप कोअर कमिटीची गेल्या आठवड्यात जळगाव येथे बैठक झाली होती. बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीला एकनाथ खडसे यांची स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते. काय म्हणाले होते गिरीश महाजन? कोअर कमिटीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित होत्या, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्या दिल्ली येथे पक्षाच्या कामानिमित्त गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहाता आलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून गेले दोन-तीन दिवस आपण त्यांच्या बरोबरच असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं. गिरीश महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं हेही वाचा..उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्त्वाचे निर्णय कोणतेही खिंडार पडणार नाही... गिरीश महाजन यांनी सांगितलं की, एकनाथ खडसेंच्या पक्षांतराने भाजपमध्ये कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही आमदार, खासदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती सापेक्ष पक्ष नसल्याचे गिरीश महाजन यावेळी म्हणाले होते.
First published:

Tags: Eknath khadse, Girish mahajan

पुढील बातम्या