पिंपरी चिंचवड : विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा भार हलका व्हावा. दप्तराचं ओझ कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नेहमी नवीन प्रयोग सुरू असतात. असाच एक प्रयोग आता पुढील वर्षापासून करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे. ते पिंपरी चिंचवडमधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले शिक्षणमंत्री ?
पुढील वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्येच वह्यांची पाने जोडली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पुस्तकालाच वह्यांची पानं जोडल्यास दप्तराचं ओझं कमी होईल. याशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवल्यानंतर लगेचच नोट काढता येतील. ते त्यांना अधिक सोप जाईल, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. याशिवसाय पुस्तकालाच वह्यांची पाने जोडण्यात आल्यानं विद्यार्थ्यांच्या खर्चामध्ये देखील बचत होणार आहे. पुस्तकालाच वह्यांची पानं असल्यामुळे विद्यार्थ्यांना वही विकत घेण्याची गरज राहणार नाही.
हेही वाचा: राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर दरेकर म्हणतात फडणवीसांचं कौतुक केलच पाहिजे
सर्वेनंतर निर्णय
या निर्णयाबाबत माहिती देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुढे म्हटलं की, पुस्तकात वह्यांची पानं जोडण्यात यावीत की नाही? याबाबत एक सर्वे करण्यात आला होता. या सर्वेला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालकांचा प्रतिसाद पाहून आम्ही पुढील वर्षापासून पुस्तकालाच वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचं ओझं हलकं होण्यास मदत होणार आहे. सोबतच शिक्षकांनी धडा शिकवल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना नोट काढता येणे देखील शक्य असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या खर्चामध्ये देखील बचत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.