मुंबई, 6 मार्च : महाराष्ट्रात ईडी पुन्हा एकदा ऍक्टिव मोडमध्ये आली आहे. मुंबई आणि नागपूरसह 15 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. पंकज मेहदिया, लोकेश आणि कथिक जैन यांनी केलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी ईडीने सर्वे केला. यानंतर ईडीला 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.
पॉन्झी स्कीमच्या आडून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीने चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पंकज नंदलाल मेहदिया त्याच्या सहकाऱ्यांसोबत पॉन्झी स्कीम चालवत होता. 2004 ते 2017 या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीवर टीडीएस कापल्यानंतर 12 टक्के परतावा देण्याचं आश्वासन गुंतवणुकदारांना देण्यात आलं होतं. या कथित घोटाळ्याचा मुख्य आरोपी पंकज मेहदिया, लोकेश जैन आणि कार्तिक जैन यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले.
सोनं, हिरे, रोख जप्त
ईडीला या छापेमारीमध्ये 5.51 कोटी रुपयांचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने, 1.21 कोटी रुपयांची रोख रक्कम, डिजीटल उपकरणं आणि अनेक आपत्तिजनक दस्तऐवज मिळालं आहे. या आरोपींवर नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यावरच ईडीने चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये ईडीला पंकज मेहदिया आणि त्याचे अन्य सहकारी पॉन्झी स्कीम चालवत होते. या स्कीमनुसार त्यांनी 2004 ते 2017 या कालावधीमध्ये गुंतवणुकदारांना टीडीएस कापल्यानंतर 12 टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवलं होतं.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहादिया यांच्याविरोधात सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडल्यामुळे ईडीने चौकशीला सुरूवात केली. ही चौकशी करताना केलेल्या छापेमारीत ईडीच्या हाती घबाड लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED