गुरूजी झाले झिंगाट, शेताच्या बांधावर झोपी गेले तर्राट!

गुरूजी झाले झिंगाट, शेताच्या बांधावर झोपी गेले तर्राट!

या शिक्षकाची दारू पिऊन शाळेत येण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील बऱ्याच वेळा ते मद्यधुंद स्थितीत शाळापरिसरात दिसून आले होते.

  • Share this:

चंद्रपूर, 04 डिसेंबर :  गोंडपिपरी तालुक्यामध्ये चक्क शिक्षकाने दारू पिऊन शाळेलगतच्या शेतात जाऊन बिनधास्त झोपी गेल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. अनिल बोरकुटे असं तळीराम शिक्षकाचं नाव आहे. गावकरी आणि पोलिसांच्या सहकार्याने 'त्या' मद्यपी शिक्षकाला गाढ झोपेतून उठवण्यात आलं.

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ या गावात घडला. पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत भंगारपेठ गावात ही प्राथमिक शाळा आहे. तेलंगणा राज्यालगत असलेल्या या परिसरात दारूचे प्रमाण मुबलक आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या तेलंगणातून या परिसरात दारूची आयात केली जाते. गटग्रामपंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत येणाऱ्या भंगारपेठ गावात २ शिक्षक कार्यरत आहेत.

शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एक शिक्षक कामानिमित्त गैरहजर राहिले. त्याच दिवशी उपस्थित राहिलेल्या अनिल बोरकुटे नामक तळीराम शिक्षकाने शाळेत येण्यापूर्वीच  दारू ढोसली. एवढ्यावरच न थांबता शाळेच्या वेळेत दुपारनंतर सुद्धा त्यांनी पुन्हा दारू प्यायली. मात्र, आपल्याला दारू जास्त झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांना खेळात मग्न ठेऊन शिक्षकांनी शाळेशेजारी असलेल्या शेतात धाव घेतली.

दरम्यान, त्यांनी शेतीतील एका बांधावर माथा ठेवला. यातच ते गाढ झोपी गेले. अखेर बऱ्याच वेळापासून बाहेर गेलेल्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरू केला. या दरम्यान गावातीलच एका व्यक्तीला हे महाशय शेतीच्या बांधावर पडून असल्याचे दिसून आले. ही बाब वाऱ्यासारखी गावात पसरताच शाळेतील विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि  गावकऱ्यांनी गुरुजींच्या दिशेने धाव घेतली.

मात्र, एकत्र जमलेल्या गर्दीच्या कल्लोळानंतरही मद्यपी शिक्षक काही उठेना. अखेर शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गोंडपिपरी पोलिसांना फोनवरून सांगितलं. पोलीस भंगारपेठ गावात दाखल झाले. पोलिसांच्या माध्यमातून त्या तळीराम शिक्षकाला झोपेतून जागविण्यात आलं. यानंतर त्या शिक्षकाला वैद्यकीय चाचणीसाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले गेले.

स्थानिक शाळा समितीच्या तक्रारीनंतर या गंभीर घटनेची नोंद गोंडपिपरी पोलिसांनी घेतली असली तरी मागील चार दिवसांपासून  त्या शिक्षकावर कुठल्याचं प्रकारची कार्यवाही अद्याप झाली नाही.

या शिक्षकाची दारू पिऊन शाळेत येण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील बऱ्याच वेळा ते मद्यधुंद स्थितीत शाळापरिसरात दिसून आले होते. यातच या शिक्षकाला भंगारपेठ गावात तब्बल १५ वर्ष झाले असतांना शिक्षण विभाग त्याच्यावर मेहेरबान कसे? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थितीत केला.

First published: December 4, 2019, 8:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading