मुंबईजवळच्या शहरात कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त, पोलिसांकडून आरोपींना अटक

मुंबईजवळच्या शहरात कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त, पोलिसांकडून आरोपींना अटक

या अमली पदार्थाची बाजारात किंमत पाहता 1 कोटी 13 लाख 79 हजार 500 रुपये असल्याचे उघड झाले आहे.

  • Share this:

भिवंडी, 22 डिसेंबर : भिवंडी तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या पिसे डॅम परिसरातील अमली पदार्थ विक्री करणारी तस्करांची दुकली पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. या तस्कर दुकलीकडून 1 किलो 70 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1 किलो 700 ग्रॅम एमडी पावडरचा साठा हस्तगत करण्यात आला.

या अमली पदार्थाची बाजारात किंमत पाहता 1 कोटी 13 लाख 79 हजार 500 रुपये असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांच्या तक्रारीवरून तस्कर दुकलीवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जाहिद मोहम्मद हनीफ शेख (वय 30 रा. मुठवाल , भिवंडी ) ईश्व्र्र मिश्रा (वय, 39, रा. बस्ती जिल्हा, उत्तरप्रदेश ) असे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत.

...आणि तस्करीचा प्रकार झाला उघड

लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारी कारवायांमध्ये घट झाली होती. मात्र आता अनलॉक काळात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात उघड झाले आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनीही गुन्हेगारी रोखण्यासाठी वॉच पेट्रोलिंग ग्रामीण भागात सुरू केली. त्यातच सोमवारी गुन्हेगारी वॉच पेट्रोलिंगसाठी सहायक पोलीस निरीक्षक , सुनील जाधव आणि भास्कर जाधव हे पोलीस पथकासह पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिसे डॅम रोड ते सावद नाका परिसरात वॉच पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तस्कर हे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात संशयास्पद हालचाली करताना दिसले.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांच्या बोलण्यातून संशय वाटल्याने पोलीस पथकांनी त्याच्या वाहनांची झडती घेतली असता यामध्ये 1 किलो 70 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1 किलो 700 ग्रॅम एमडी पावडरचा साठा आढळून आला. त्यासोबतच एक डिजिटल वजन काटाही पोलीस पथकाला आढळून आला.

याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात तस्कर दुकलीवर गुन्हा दाखल करून आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात हे अमली पदार्थ आरोपींनी कुठून आणले आणि ते कोणाला विक्री करीत होते, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 22, 2020, 11:31 PM IST

ताज्या बातम्या