दुष्काळाच्या झळा...जनावरं खाटकाला विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ!

दुष्काळाच्या झळा...जनावरं खाटकाला विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ!

चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मायबाप सरकारनं लवकर पाऊल उचलावं अन्यथा आठवडी बाजार उध्वस्त होतील

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर, 6 डिसेंबर : दुष्काळानं जनावरांचा बाजार देखील कोलमडला आहे. जनावरांना चारा नसल्यानं शेतकऱ्यांनी आपली  जनावरं विक्रीसाठी बाजारात आणली मात्र भावच नसल्यानं ही जनावरं खाटकाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी कमी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडलंय  त्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्यानं शेतकऱ्यांना आपली जनावरं बाजारात नेऊन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र आठवडी बाजारात देखील शेतकऱ्यांना आपली जनावरं कमी भावात विकण्याची वेळ येत आहे.

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील जनावरांच्या आठवडी बाजारात काही कोटींचा व्यवसाय होतो. मात्र आता या बाजारात देखील व्यवहार निम्म्यावर आले आहेत. एरवी पाय ठेवायलाही जागा नसलेला हा बाजार आता निम्म्यावर आलाय. आधीच पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या पदरात कांहीच पडलं नाही,  शिवाय पोटाच्या लेकरांप्रमाणं पोसलेल्या जनावरांना चारा देखील मिळणं कठीण झालंय.

त्यामुळं घरं चालवायला शेतकऱ्यांना जनावरांना विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज जर आपल्या गाई म्हशींना किंवा बैलजोडीना चांगला भाव मिळाला घर तरी चालवता येवू शकते. शिवाय पुढच्या वर्षी दुष्काळ संपल्यास उरलेल्या आणि नव्या पैशातून पुन्हा जनावरं खरेदी करता येईल.

याच आशेवर बळीराजा गिऱ्हाईकांची वाट पाहतोय , मात्र लाखांची बैलजोडी पंचवीस ते तीस हजारात मागितली जातेय. त्यामुळं नाईलाजानं शेतकऱ्यांना खाटकाच्या दावणीला आपली जनावरं बांधल्याखेरीज पर्याय नसल्याचं शेतकरी सांगतात.

लातूर जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी भरणाऱ्या आठवडी जनावरांच्या बाजारातली हीच परिस्थिती सध्या निर्माण झालीय. चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मायबाप सरकारनं लवकर पाऊल उचलावं अन्यथा आठवडी बाजार उध्वस्त होतील आणि शेतकऱ्यांकडं जनावरं शिल्लक राहणार नाहीत शेतकऱ्यांची भावना आहे.

VIDEO: चारा छावण्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री राम शिंदे यांचं संतापजनक वक्तव्य

First Published: Dec 6, 2018 07:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading