Home /News /maharashtra /

#Durgotsav2018 : जीवघेणे हल्ले पचवून आदिवासींसाठी लढणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हेंची प्रेरक कहाणी

#Durgotsav2018 : जीवघेणे हल्ले पचवून आदिवासींसाठी लढणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हेंची प्रेरक कहाणी

अमरावती जिल्ह्यातल्या दुर्गम अशा मेळघाटातल्या बैरागड इथं गेली तीन दशकांपासून त्यांनी आदिवासींच्या आयुष्यात नवा प्रकाश आणलाय.

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे  नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्वानं महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून.  या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

अमरावती : डॉ. स्मिता कोल्हे या गेल्या ३० वर्षांपासून मेळघाटात आदिवासींच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वागिंण प्रगतीसाठी निष्ठेने काम करताहेत. अमरावती जिल्ह्यातल्या दुर्गम अशा मेळघाटातल्या बैरागड इथं गेली तीन दशकांपासून त्यांनी आदिवासींच्या आयुष्यात नवा प्रकाश आणलाय.  बैरागडसारख्या कुठल्याही सोयी नसलेल्या गावात मागासलेल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं त्यांचं काम अनेकांना प्रेरणादायी ठरलं आहे.

नागपूरातल्या वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चं शिक्षण घेत असतानाच त्यांचा डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याशी विवाह झाला. डॉ. कोल्हे हे त्यावेळी धारणी तालुक्यातल्या बैरागड इथं आदिवासींसाठी सेवा देत होते. घरची संपन्न स्थिती असतानासुद्धा डॉ. स्मिता यांनीही पती सोबत आदिवासींच्या विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. बैरागड  हेच त्याची कर्मभूमी झालं. डॉ. रवी व स्मिता कोल्हे यांनी प्रारंभी आरोग्यसेवा दिली. नंतर शिक्षण आणि शेती असा कामाचा विस्तार केला.  गांधी व विनोबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्या हे काम करताहेत. वीस वर्षांपूर्वी रेशन वितरणाची स्थिती भयावह होती. कोल्हेंनी बैरागड भागात ही व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना आधी शासकीय पातळीवर व नंतर गावगुंडांशी खूप लढावे लागले. यातून जीवघेणे हल्ले झाले तरीही हे दाम्पत्य डगमगले नाही. स्वत: रेशनिंगचे दुकान थाटून त्यांनी आदिवासींना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले. कोल्हेंनी ३० एकर शेती घेऊन त्यात नवनवे प्रयोग केले. यातून शेकडो आदिवासींनी प्रेरणा घेतली. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे तर धर्मबदलाची गरज काय, हा सवाल त्यांनी ख्रिस्ती मिशनरी संस्थांना केला. यावरून त्यांना हिंदुत्ववादी ठरवले गेले, पण हे दाम्पत्य डगमगले नाही.  एवढे काम करूनही त्यांची कायम उपेक्षा झाली. पण त्याची तमा न बाळगता त्यांचं काम सुरूच असून त्यातून अनेकांनी प्रेरणाही घेतलीय. डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्याला आमचा सलाम.
First published:

Tags: आदिवासी, मेळघाट

पुढील बातम्या