उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोना रुग्णांसाठी; सोलापूरच्या डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी

उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोना रुग्णांसाठी; सोलापूरच्या डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी

कोरोनाच्या या बिकट काळात सोलापूरमध्ये (Solapur Corona Update) एका डॉक्टरांनी आपले नव्याने उभारलेले सहा मजली रुग्णालय उद्घाटनापूर्वीच कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे.

  • Share this:

सोलापूर, 21 एप्रिल: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची (Maharashtra Corona Update) चिंता वाढवणारी आहे. मंगळवारी राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी रुग्णालयात जागाही मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांना घेऊन नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. अशा या बिकट काळात सोलापूरमध्ये (Solapur Corona Update) एका डॉक्टरांनी त्यांनी नव्याने उभारलेले सहा मजली रुग्णालय उद्घाटनापूर्वीच कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे होणारे हाल वाचणार आहेत. अमजद सय्यद, असे या डॉक्टरांचे नाव असून त्यांच्या या कामामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

अमजद सय्यद यांनी अलिकडेच सहा मजली रुग्णालय बांधले आहे. मात्र, सध्याची कोरोनाची स्थिती पाहता या दवाखान्याचे थाटात उद्घाटन करण्याचे बाजूला ठेवून त्यांनी आपले रुग्णालय कोरोना (Covid Hospital Solapur) रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

डॉक्टर अमजद बशीर अहमद सय्यद हे हृदयरोग तज्ज्ञ असून ते सोलापूरच्या पद्मशाली चौक येथे राहतात. त्यांनी नुकतेच सहा मजली रुग्णालय सुरू केले असून त्याठिकाणचे फर्निचरचे कामंही अद्याप पूर्ण झाले नव्हते. दरम्यान, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनसह इतर सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. याचा विचार करून डॉक्टर अमजद सय्यद यांनी त्यांचे 'नोबेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर' नावाचे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनपा प्रशासनास त्यांनी प्रस्ताव पाठवला, प्रशासनाने रुग्णालयाची पाहणी करून लगेच तो प्रस्ताव मान्य केला.

(हे वाचा - News18 Lokmat Impact : बंद पडलेले कोविड सुरू झाले अन् 4 रुणांना मिळाले बेड!)

25 ऑक्सिजनचे बेड तयार

सध्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 25 ऑक्सिजनचे बेड तयार केले असून 25 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयाने वैद्यकीय कर्मचारीसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी आता आणखी एक रुग्णालय मिळाले आहे.

(हे वाचा - Corona Update : देशात मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येनं गाठला नवा उच्चांक, 2020 जणांचा मृत्यू)

कोरोनाचे रुग्ण वाढत असून खाटांची संख्या कमी पडत आहे, अशा वेळी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. कोरोनामुळे नाहक लोकांचा बळी जात आहे, त्यांचे जीव वाचवण्यासाठी मी माझे रुग्णालय दिले, यात मला समाधान आहे, उद्घाटन आज नाही तर उद्या होईल ते महत्त्वाचे नाही, अशा कठीण प्रसंगी मी उपयोगाला आलो हे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर अमजद सय्यद म्हणाले.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 11:06 AM IST

ताज्या बातम्या