डोंबिवली, 14 डिसेंबर : राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षाच्याा मुलाला बेदम मारहाण झाली. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षांना पोलीस ठाण्यात दोन तास अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारानंतर अखेर पोलिसांनी आरोपींना अटक केली.
डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव परिसरात राहणारे विश्वनाथ पाटील यांचा या परिसरात राहणारे बबन पडवळ यांच्याशी काही वाद झाला. या वादानंतर बबन पडवळ आणि त्यांचा मुलगा शुभम पडवळ यांनी विश्वनाथ पाटील यांचा मुलगा प्रथम पाटील याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रथम पाटील गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई झाली नाही म्हणून विश्वनाथ पाटील यांची पत्नी विनया पाटील या मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचल्या. विनया यांचा आरोप आहे की, दारुच्या नशेत आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी त्यांची साधी वैद्यकीय चाचणी केली नाही. किरकोळ कलमे लावून त्यांना सोडण्यात आले, असा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे विनया तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात न्यायासाठी रडत होत्या. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष वंडार पाटील त्याठिकाणी पोहचले. अखेर मानपाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तब्बल दोन तास सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकारी विनया पाटील यांना ठोस कारवाईसाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गयावया करावी लागली. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांसोबत पोलिसांची काय वागणूक असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.